शिरूर : तालुक्यातील एका मोठ्या गावात व्यावसायिक स्पर्धेतून एका उद्योजकाची हत्या घडवून आणण्यासाठी परराज्यातील शार्प शूटरला सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, हल्लेखोरांकडून लक्ष्याची ओळख चुकल्याने उद्योजकासारखा दिसणाऱ्या एका निष्पाप कामगाराचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील तरुण आणि त्याच्या नातेवाईक असलेल्या उद्योजकांमध्ये व्यावसायिक स्पर्धेतून वाद सुरू होता. आपल्या व्यवसायात अडथळे निर्माण केले जात असल्याचा संशय एका पक्षाला होता. त्यातून संबंधित उद्योजकाला ठार मारण्यासाठी लाखो रुपयांची सुपारी देऊन परराज्यातून शार्प शूटर बोलावण्यात आल्याचे तपासात समोर येत आहे.
हल्लेखोरांनी दोन दिवस गावात मुक्काम करून लक्ष्याची रेकी केली. दरम्यान, संबंधित उद्योजकाच्या घरात निधन झाल्याने तो घराबाहेर पडला नव्हता. त्यानंतर एका सकाळी उद्योजकाच्या मालकीच्या फ्लॅटवर त्याच्यासारखा दिसणारा कामगार आल्याचे हल्लेखोरांच्या निदर्शनास आले. तोच लक्ष्य असल्याचा समज झाल्याने शूटरने त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोळीबारामागील व्यावसायिक वैराचा धागा शोधला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या कटामागे राजकीय कुटुंबातील एका तरुणाचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रमुख संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाची अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, तालुक्यात यापूर्वीही गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र, यावेळी परराज्यातील शूटरचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांसमोर या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या कटामागे नेमके कोण, सुपारीची रक्कम किती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

