इचलकरंजी (विशेष प्रतिनिधी): हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील लोकमान्य नगर परिसरात स्वतःच्या घराच्या पाठीमागे गांजाची झाडे लावून तिची जोपासना करणाऱ्या एका तरुणावर शाहपूर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजाची झाडे, गांजा आणि नशा करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १८,०७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २२:५५ वाजताच्या सुमारास कोरोची (ता. हातकणंगले) येथील लोकमान्य नगर तानाजी चौक परिसरात आरोपी राजेश शिवशंकर उर्फ शंकर साहा उर्फ शहा (वय १९ वर्ष, रा. लोकमान्य नगर, कोरोची) हा आपल्या राहत्या घराच्या मागील बाजूस भिंतीला लागून अमली पदार्थ असलेल्या गांजाची झाडे लावून त्यांची जोपासना व संवर्धन करत होता. स्वतः नशा करण्यासाठी तसेच विक्रीच्या उद्देशाने त्याने ही झाडे लावल्याचे निदर्शनास आले.
जप्त केलेला मुद्देमाल:
शाहपूर पोलिसांनी छापा मारून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
* गांजाची झाडे: सुमारे ५ ते ६ फूट उंचीची, हिरवी पाने, फुले व बोंडे असलेली ४ झाडे (वजन ७७८ ग्रॅम, किंमत रू. १८,०००/-).
* गांजा: प्लास्टिक पिशवीत असलेला २ ते ३ ग्रॅम गांजा (किंमत रू. ५०/-).
* नशा करण्याचे साहित्य: गांजा ओढण्यासाठी तयार केलेली छिद्र पडलेली विशेष प्लास्टिक बाटली (किंमत रू. २०/-) आणि दोन लायटर (किंमत रू. २०/-).
* एकूण मुद्देमाल: १८,०७० रुपये.
गुन्हा दाखल व पोलीस पथक:
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र डावाळे (बकल नं. १३३३, नेमणूक शाहपूर पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध ‘गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम १९८५’ (NDPS Act) चे कलम ८(c) व २०(a) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ५७३/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र लोहार आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. महावीर कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सह फौजदार अविनाश मुंगसे, पो.कॉ. रोहित डावाळे, पो.कॉ. कुंभार, पो.कॉ. कांबळे आणि म.पो.हे.कॉ. यादव यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पो.स.ई. श्री. कुटे करत आहेत.

