लातूर (प्रतिनिधी) : नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून लातूर येथील अल्फाबेट प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये दांडिया स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून आकर्षक दांडिया नृत्य सादर केले. त्यांच्या निरागस अदाकारीने आणि उत्स्फूर्त नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमात मुलींनी रंगीबेरंगी घागरा-चोळी, तर मुलांनी कुर्ता, फेटा आणि शेरवानी अशा पारंपरिक पोशाखांत सहभाग घेतला. संगीताच्या तालावर दांडिया खेळताना विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन केले. चिमुकल्यांच्या नृत्याविष्कारामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण आनंदमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.
शाळेच्या प्राचार्य सविता बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मॅडम मोहिनी मुके, मॅडम सुप्रिया हाके आणि मॅडम प्रतीक्षा तोर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सादरीकरण करावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवाचे महत्त्व, दांडिया नृत्याची परंपरा आणि भारतीय संस्कृतीतील विविध सण-उत्सवांचे स्थान याविषयी माहिती दिली. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि सांघिक भावना विकसित होण्यास मदत होते.
चिमुकल्यांच्या आकर्षक वेशभूषेने आणि उत्स्फूर्त नृत्याने पालकांसह उपस्थितांची मने जिंकली. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनाही महत्त्व दिले जात असल्याचे या आयोजनातून दिसून आले.

