महाड, प्रतिनिधी : महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पडवी, ता. महाड, जि. रायगड येथे घरफोडी करून दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आनंद जी. रावडे यांचा रायगडच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांना प्रशस्तिपत्र, २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पडवी येथे घरफोडी करून दागिने चोरून चोरटे पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी तपासातील कौशल्याचा वापर करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. तसेच संबंधित आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांचा गौरव करण्यात आला.या सन्मानामुळे पोलीस दलातील प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, अथक परिश्रम आणि तपासातील कौशल्याला प्रोत्साहन मिळाले आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी घेतलेली मेहनत आणि जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेल्या कार्याची ही पोचपावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद जी. रावडे यांनी हा सन्मान आपल्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेची पावती असल्याचे सांगितले. तसेच रायगडच्या पोलीस अधीक्षक मॅडम, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि या तपासात सहकार्य करणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.रावडे यांच्या या कामगिरीमुळे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्याची दखल घेतली गेली असून, त्यांच्या यशाबद्दल पोलीस दलातून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

