Explore

Search

December 25, 2025 11:09 pm

राज्यातील 23 नगरपरिषदा–नगरपंचायतींसाठी उद्या मतदान; 21 डिसेंबरला निकाल जाहीर

महाराष्ट्र : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, उद्या म्हणजेच 20 डिसेंबर रोजी राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील एकूण 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र विविध प्रशासकीय व तांत्रिक कारणांमुळे 23 ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता त्या सर्व ठिकाणी उद्या मतदान होणार आहे.या मतदानात अध्यक्षपद, सदस्यपद तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील एकूण 143 रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी मतदार कौल देणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

उद्या होणाऱ्या मतदानात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, पुणे जिल्ह्यातील बारामती व फुरसुंगी–उरुळी देवाची, सोलापूर जिल्ह्यातील अनगर व मंगळवेढा, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व फलटण येथे मतदान होणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, नांदेड जिल्ह्यातील मुखेड व धर्माबाद, लातूर जिल्ह्यातील निलंगा व रेणापूर, हिंगोलीतील वसमत, अमरावतीतील अंजनगावसूर्जी, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, यवतमाळमधील यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, वर्धा जिल्ह्यातील देवळी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथेही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. शांततापूर्ण आणि पारदर्शक मतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.या निवडणुकांसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांपासून ते राज्यस्तरीय राजकारणापर्यंत विविध विषयांवर प्रचारसभा, पदयात्रा आणि जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळाला. अनेक ज्येष्ठ नेते व पक्षप्रमुखांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.आता मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून 21 डिसेंबरला जाहीर होणारे निकाल स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर