पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) साठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे विशाल तांबे यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झालेली असताना आणि सर्वच पक्ष तयारीला लागले असताना हा निर्णय आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच तांबे यांनी अचानक घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विशाल तांबे हे धनकवडी परिसरातून सलग तीन वेळा पुणे महापालिकेत निवडून आले होते. त्यांनी 2007, 2012 आणि 2017 या तीनही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही यशस्वीपणे भूषवले होते. त्यांच्या कार्यकाळात विकासकामे, नागरिकांशी थेट संवाद आणि संघटनात्मक बांधणी यासाठी ते ओळखले जात होते.
आपल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विशाल तांबे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“मी आगामी महानगरपालिका निवडणुकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे कोणत्याही पक्षावर नाराजी नाही. जवळपास 19 वर्षे नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे.” तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यासंदर्भात आपली भूमिका त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर मांडल्याचेही तांबे यांनी सांगितले. राजकारणातून संन्यासाची घोषणा करताना विशाल तांबे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “जरा विसावू या वळणावर…” या शीर्षकाखाली त्यांनी धनकवडीतील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला आहे.
पोस्टमध्ये त्यांनी धनकवडीला आपले विस्तारित कुटुंब संबोधत म्हटले आहे की,
“धनकवडी हे केवळ मतदारसंघ नाही, तर माझं कुटुंब आहे. येथील प्रत्येक नागरिक, माता-भगिनी हे माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. या नात्यातील आपुलकी, विश्वास आणि प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहे.”तांबे यांनी पुढे लिहिले की, धनकवडीतील नागरिकांचे आपल्यावर मोठे ऋण असून त्या ऋणातून उतराई व्हायची नाही, तर त्या ऋणानुबंधांना मनात साठवून ठेवायचे आहेत. गेल्या 30 वर्षांचा प्रवास आठवताना त्यांनी सांगितले की, या परिसरात वाढताना सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचे संस्कार रुजले आणि त्यातूनच सार्वजनिक जीवनाची वाटचाल सुरू झाली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर विशाल तांबे यांचा हा निर्णय राष्ट्रवादीसाठी संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरी त्यांनी सध्या राजकारणातून विश्रांती घेण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा ठसा पुण्याच्या राजकारणावर कायम राहील, असे मत व्यक्त केले जात आहे.

