जेजूरी : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र जेजुरीमध्ये हा आनंदाचा क्षण भीषण दुर्घटनेत बदलला. जेजुरी नगरपरिषद निवडणुकीनंतर काढण्यात आलेल्या विजयोत्सवात भंडाऱ्याचा भडाका उडाल्याने आग लागली आणि या आगीत दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. या गोंधळात एका १० वर्षीय मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
नेमकं काय घडलं?
नगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीजवळील नंदी चौक परिसरात एकत्र जमले होते. विजयाचा जल्लोष सुरू असताना महिलांकडून औक्षण करण्यात येत होते. त्याच वेळी भंडाऱ्याची उधळण सुरू असताना अचानक भंडाऱ्यातील ज्वलनशील पदार्थामुळे मोठा भडाका झाला. काही क्षणातच आग पसरली आणि समोर उभे असलेले नागरिक, महिला व लहान मुले होरपळली. आग लागताच परिसरात एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक धावत असताना रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे पळण्यासाठी जागाच उपलब्ध नव्हती. परिणामी मोठी चेंगराचेंगरी झाली आणि अनेक जण जखमी झाले.
भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईची मागणी…
स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेजुरी परिसरात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री सुरू आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेवर जेजुरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करणे ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकेच्या भेसळ प्रतिबंधक विभागाची जबाबदारी आहे. यापुढे गडावर भेसळयुक्त भंडारा नेऊ नये यासाठी फलक लावण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.
अतिक्रमणामुळे वाढला धोका..
नंदी चौक परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्नही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाविक व स्थानिक नागरिकांना या अतिक्रमणामुळे कायमच अडचणींचा सामना करावा लागतो. कालच्या दुर्घटनेदरम्यान रस्त्यावरील विक्रेत्यांच्या स्टॉल्समुळे लोकांना पळताना अडथळे आले आणि परिस्थिती अधिक गंभीर बनली. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने वेळेत अतिक्रमण हटवले असते आणि भेसळयुक्त भंडाऱ्यावर कडक निर्बंध घातले असते, तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी भावना जेजुरीतील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
