Explore

Search

December 25, 2025 8:14 pm

अजित पवार गटाला निवडणुकीआधी धक्का; भाजपकडून दोन माजी नगरसेवकांची फोडणी, शेकडो कार्यकर्ते कमळाच्या वाटेवर

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून तणाव वाढलेला असतानाच भाजपने राजकीय डाव साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना लक्ष्य करत भाजपने पक्षफोडीचे राजकारण अधिक आक्रमक केल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, दादांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या नेत्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.

सोलापुरात मध्यरात्री पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मनपा गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बाजूला ठेवत कमळ हाती घेतले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. महायुतीत नेते व कार्यकर्त्यांची पळवापळवी टाळण्याचे ठरले असतानाही भाजपने हा राजकीय धक्का दिल्याने आघाडीत अस्वस्थता वाढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये अजित पवार गटाने चांगली कामगिरी केली होती. मराठवाड्यात तर शिंदे गटालाही मागे टाकत राष्ट्रवादीने ताकद दाखवली होती. मात्र, आगामी निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांकडूनच दबाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करताना किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी पक्षातील अंतर्गत कारभारावर नाराजी व्यक्त केली. शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या मनमानीमुळे कंटाळा आल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट जवळ येत असतानाच सोलापुरात भाजपने अजित पवार गटाचे ‘हुकमी एक्के’ फोडल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. “पैलवान गडी असल्याने अभ्यासापेक्षा मनगटशाहीवर भर दिला जातो. सत्तेत असताना पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करायला हवे होते,” असा टोला त्यांनी लगावला.

पंढरपूर आणि सांगोला येथे पराभव का झाला, याचा विचार न करता केवळ रेटून बोलले जात असल्याची टीका ढोबळे यांनी केली. तसेच, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार आमदार असतानाही पराभव का झाला, याबाबत आमदारांनाच विचारा, माझ्याकडे अधिकार नसताना भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सुमारे 30 महामंडळांकडे निधी आणि कर्मचारी नसल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहितीही लक्ष्मण ढोबळे यांनी दिली. एकूणच, निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशांमुळे अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली असून, सोलापूरच्या राजकारणात भाजप अधिक आक्रमक होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर