Explore

Search

February 9, 2026 8:08 am

राजकीय गणित जुळलं; संभाजीनगर महापालिकेसाठी भगवा युती !

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात अखेर युती निश्चित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरून दोन्ही पक्षांत तीव्र मतभेद दिसून येत होते. मात्र, अनेक बैठका आणि चर्चांनंतर दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई झाली असून महापालिका निवडणूक एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ भाजप आणि शिवसेना एकत्र येत महापालिकेवर सत्ता गाजवत होत्या. मात्र मागील निवडणुकीत भाजप–शिवसेना यांच्यातील मतभेदांचा फायदा घेत एमआयएमने जोरदार मुसंडी मारली 87 होती. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही एमआयएमचा प्रभाव वाढलेला दिसून आला होता. याच पार्श्वभूमीवर यावेळी भाजप आणि शिवसेनेने एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या एकूण 115 जागांपैकी भाजप आणि शिवसेना मिळून  जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये भाजप 45 जागांवर तर शिवसेना 43 जागांवर उमेदवार देणार आहे. उर्वरित जागांबाबत मुस्लिमबहुल प्रभागांचा विचार करून चर्चा सुरू असून त्या संदर्भात इतर पक्ष आणि स्थानिक उमेदवारांशी बोलणी केली जाणार आहेत.

युतीचा अंतिम फॉर्म्युला ठरवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक खासदार डॉ. भागवत कराड यांच्या निवासस्थानी सुरू आहे. या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, भाजप व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. काल रात्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. आजच्या बैठकीनंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने जागावाटप करताना असंतोष उफाळण्याची शक्यता आहे. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

जागा कमी आणि इच्छुक अधिक असल्यामुळे बंडखोरी थंड ठेवणे हे भाजप–शिवसेनेसमोर मोठे आव्हान असणार आहे. अंतिम चर्चा पूर्ण झाल्यानंतर लवकरच युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत नेत्यांकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर