Explore

Search

February 9, 2026 8:08 am

पुणे–पिंपरी-चिंचवड निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीची मोठी एकजूट; अजित पवार–शरद पवार गट एकत्र !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२८ डिसेंबर २०२५) मोठी घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. “परिवार पुन्हा एकत्र येत आहे,” असे भावनिक विधान करत त्यांनी या युतीवर शिक्कामोर्तब केले.

गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या विरोधात राजकीय लढाई लढणारे अजित पवार आणि शरद पवार गट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेत जागावाटपाचे प्राथमिक सूत्र ठरले असून अजित पवार गट सुमारे १२५ जागांवर उमेदवार देणार आहे, तर शरद पवार गट सुमारे ४० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या युतीची अधिकृत घोषणा आणि पुढील रणनिती आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत मांडली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी देखील राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटपाची अंतिम यादी जाहीर होणार आहे. तळवडे येथील प्रचार सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, शहराच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या हितासाठी कधी कधी कठोर पण आवश्यक निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी नमूद केले.सुरुवातीला सर्व उमेदवारांनी ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह अजित पवार गटाकडून धरला जात होता. मात्र त्याला शरद पवार गटाने विरोध केला होता. आता समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार गट घड्याळ चिन्हावर, तर शरद पवार गट तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. म्हणजेच दोन्ही पक्ष आपापली चिन्हे कायम ठेवत युतीत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

या वेळी अजित पवार यांनी १९९२ ते २०१७ या कालखंडातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याचा उल्लेख करत हिंजवडी आयटी पार्कचे श्रेय शरद पवारांना दिले. तसेच सध्याच्या सत्तेतील भ्रष्टाचार आणि विरोधकांकडून उमेदवारांना मिळणाऱ्या धमक्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. ही युती केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित राहणार की राज्याच्या राजकारणावरही मोठे पडसाद उमटणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर