पुणे : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही ठिकाणी युती, आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी पक्षांकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुण्यात दिसलेली एकत्रित भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
नुकताच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकत्र दिसले. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, “दोन राष्ट्रवादी मानाने एकत्र आल्या नसत्या तर जाहीरनामा एकत्र प्रसिद्ध झाला नसता. आदरणीय ताई आणि दादा एकाच मंचावर दिसले नसते.” याशिवाय शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो पाहून पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील का, या प्रश्नावर बोलताना अमोल कोल्हे यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं. “मी सध्या अभिनय आणि थोडंफार राजकारण करतोय, पण अजून भविष्य सांगण्याइतका पुढे गेलेलो नाही,” असं ते म्हणाले.
दरम्यान, याच मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी “तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे तो घ्या,” अशी प्रतिक्रिया दिली. तर अजित पवार यांनी “थांबा आणि पाहा,” असं सूचक उत्तर दिलं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्र येण्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध चांगले आहेत, मात्र राजकीय मतभेद होते आणि आजही आहेत.”
या घडामोडींमुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

