अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे घरात घुसून कुटुंबीयांना लोखंडी रॉडने मारहाण करत मंगळसूत्र व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपींकडून जबरी चोरीतील ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत आणखी एका घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.
११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील भुतवडा येथील सुरेश जालींदर डोके यांच्या घरात चार अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला. यावेळी आरोपींनी डोके व त्यांच्या आईला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र तसेच घरातील रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४९/२०२६, बीएनएस कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई
२६ सप्टेंबर रोजी तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, सदर जबरी चोरीचा गुन्हा किरण गोविंद चव्हाण आणि अनिल गौतम काळे यांनी त्यांच्या साथीदारांसह केला आहे. त्यानुसार पथकाने जामखेड येथील मिलिंदनगर परिसरात कारवाई करत किरण गोविंद चव्हाण (वय १९) आणि अनिल गौतम काळे (वय १८) या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी हा गुन्हा त्यांच्या साथीदारांसह केल्याची माहिती दिली. त्यात किरण रावसाहेब काळे, रोहित अशोक काळे, कोहिनूर दीपक काळे, ओमकार फुलचंद काळे आणि करण अशोक पवार यांचा समावेश असल्याचे समोर आले. हे आरोपी सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी एक घरफोडीचा गुन्हा उघड
ताब्यातील आरोपी किरण चव्हाण याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार रोहित अशोक पवार याच्यासह कृष्णा भोसले यांच्या घरात चोरी केल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे जामखेड पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ५५०/२०२६, बीएनएस कलम ३०५ (अ) हा घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आला.
मंगळसूत्र विक्रीसाठी दिल्याचे तपासात निष्पन्न
जबरी चोरीतील सोन्याचे मंगळसूत्र विक्रीसाठी दिल्याची माहिती किरण चव्हाण याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी परवेज अझहर सय्यद (वय ४१, रा. बीड रोड, जामखेड) आणि किरण उर्फ दादा शंकर काळे (वय ३०, रा. मिलिंदनगर, जामखेड) यांना ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी मंगळसूत्र सोमनाथ झुंबर खवळे यांच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार सोमनाथ खवळे यांनी ६ ग्रॅम वजनाचे, ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. पंचांसमक्ष ते जप्त करण्यात आले.तसेच किरण चव्हाण याने चोरी केलेले दोन मोबाईल स्वतःच्या घरात ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त केले. अशाप्रकारे या कारवाईत एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपींना जप्त मुद्देमालासह जामखेड पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

