Explore

Search

October 17, 2026 4:50 am

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला धक्का; बब्रुवाहन रोंगे अपक्ष मैदानात, शिंदे गटाचीही दावेदारी !

पुणे : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत आता बंडखोरीची भर पडली आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर स्वेरी कॉलेजचे संस्थापक बब्रुवाहन रोंगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर रोंगे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची भूमिका घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. पुणे विभागातील पाच जिल्हे आणि 58 तालुक्यांमध्ये शिक्षकांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर काम केले असून, या कामाच्या जोरावर निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रोंगे यांच्या म्हणण्यानुसार, पुणे विभागात जवळपास 38 हजार शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आपले काम पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्यात आपण कमी पडलो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत नसल्याचे रोंगे यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अनेक वर्षे काम केले असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर नव्हे, तर पसंतीक्रमाच्या पद्धतीने होत असल्याने आपल्यावर पक्षाकडून दबाव येण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी म्हटले.”माझ्यावर कितीही दबाव आला तरी माझी उमेदवारी निश्चित आहे. ही निवडणूक मी जिंकणारच,” असा विश्वास रोंगे यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे गटाचीही पुणे शिक्षक मतदारसंघावर नजर

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनही जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मंगेश चिवटे यांच्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील जागावाटपाचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने महायुतीतील चर्चांना आणखी वेग आला आहे.

अमरावतीतही भाजपला बंडखोरीचा फटका?

दुसरीकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघातही महायुतीसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. पोहरादेवीचे महंत आणि पेशाने प्राचार्य असलेले सुनील महाराज यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. ते सोमवारी नामांकन अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपमधील इच्छुकांकडूनच बंडखोरी होत असल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे आणि अमरावती या दोन्ही शिक्षक मतदारसंघांतील बंडखोरीचा फटका महायुतीला कितपत बसतो, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर