खेड : खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक ग्रामस्थांची गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेली स्वतंत्र ग्रामपंचायत इमारतीची मागणी अखेर पूर्ण झाली. ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ अंतर्गत २५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
ग्रामपंचायत इमारतीअभावी ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. नूतन इमारतीमुळे ग्रामस्थांना शासकीय कामकाजासाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजालाही अधिक सुसूत्रता येणार आहे.सुमारे सात दशकांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने कळंबणी बुद्रुकच्या विकास प्रक्रियेला चालना मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली. या नूतन वास्तूमुळे गावातील विविध विकासकामांच्या नियोजनासाठीही अधिक सक्षम प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य अरुण ऊर्फ आण्णा कदम, सभापती डॉ. आफिया पालेकर, खेड तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्या मानसीताई जगदाळे, रेवतीताई पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कांगणे, गटविकास अधिकारी करपे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, नम्रता तांबट, सौ. कासार, सरपंच भगवान साळुंखे, उमेद बचत गटाच्या महिला सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

