Explore

Search

October 17, 2026 4:11 am

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन; ठाकरे बंधू पुन्हा मैदानात !

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दादर येथील शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट व बाचाबाची झाली. पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांसह सुमारे ३०० जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या सुटकेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आक्रमक झाल्याने परिसरात राजकीय वातावरण तापले.

आंदोलकांच्या सुटकेच्या मागणीसाठी दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. वाढता दबाव लक्षात घेऊन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका केली.मात्र, आंदोलनानंतर आता पोलिसांनी संबंधित आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

आदित्य, अमित यांच्यासह तेजस ठाकरेही आंदोलनात

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांचे बंधू तेजस ठाकरेही पहिल्यांदाच अशा आंदोलनाच्या ठिकाणी सक्रियपणे दिसून आले. तेजस ठाकरे हे सक्रिय राजकारणापासून दूर असतात. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.आंदोलकांच्या सुटकेसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही पुढाकार घेतला. पोलिस ठाण्याबाहेर आल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी वाहनाच्या छतावर चढून उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन केले. दुसरीकडे, सेना भवन परिसरातही आदित्य ठाकरे यांनी ठिय्या देत आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर निशाणा

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत परस्पर बदल करण्यात आल्याचा आणि त्यामुळे कोट्यवधी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.“या आंदोलनात सहभागी झालेल्यांना आम्ही सलाम करतो. पुढील आंदोलन कुठे होणार, हे लवकरच जाहीर करू. सर्वांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मनसेकडून सह्यांची मोहीम; राज ठाकरेंची बैठक

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून आज पुन्हा दादर-शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी सह्यांची मोहीम राबवण्याचे नियोजन आहे. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी ११ वाजता शिवतीर्थ येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, आजच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर