रिसोड ( प्रतिनिधी ) : भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रिसोड येथील रहेमानिया उर्दू हायस्कूलमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याला उजाळा देत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बिलाल अहमद खान होते. त्यांनी आपल्या भाषणातून डॉ. अब्दुल कलाम यांचे वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान, देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य आणि विद्यार्थ्यांना दिलेले प्रेरणादायी संदेश यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन शिक्षणाला प्राधान्य द्यावे, ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करावेत आणि जीवनात यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी स्थानिक संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहमान यांच्यासह फारूक सर, रेहान सर, इरशाद सर, रिजवान सर, साबेर सर आणि फय्याज सर उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

