Explore

Search

October 17, 2026 5:02 am

“महानगरपालिका प्रचारात फडणवीस आक्रमक; बुलेट ट्रेनवरून उद्धव ठाकरेंवर टीका”

ठाणे : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, प्रमुख राजकीय नेते विविध शहरांमध्ये प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात ठाणे वैभव वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाण्याच्या वाहतूक समस्येपासून ते बुलेट ट्रेन प्रकल्पापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीकाही केली.

ठाण्याच्या वाहतुकीला दिलासा देण्याचा दावा.

ठाणे आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक कोंडीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा प्रश्न गंभीर असून तो सोडवणं अत्यावश्यक आहे. “मागील सरकारच्या काळात केवळ 11 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होती. मात्र आमच्या सरकारने हा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढवून सध्या 415 किलोमीटर मेट्रो सुरू केली आहे. एकूण 475 किलोमीटरपैकी सुमारे 50 किलोमीटर मार्गांवर सध्या टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यासाठी रिंग मेट्रो प्रकल्पही महत्त्वाचा ठरणार असून, त्यामुळे शहरातील वाहतूक प्रवाहात मोठा बदल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, उपनगरीय रेल्वेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत प्रवाशांना लटकून, गर्दीतून प्रवास करावा लागत होता. मात्र आता सर्व लोकल डबे वातानुकूलित आणि पूर्णपणे बंद स्वरूपाचे असतील, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल.

बुलेट ट्रेनवरून उद्धव ठाकरेंवर टीका

ठाणे रिंग मेट्रो आधी सुरू होणार की बुलेट ट्रेन, या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दोन्ही प्रकल्प जवळपास एकाच कालावधीत पूर्ण होतील. “या दोन्ही प्रकल्पांमध्ये जणू काही स्पर्धाच सुरू आहे,” असे ते म्हणाले.

याचवेळी त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या रखडण्यामागे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “बुलेट ट्रेन प्रकल्प आधीच पूर्ण झाला असता. पण मध्यंतरी उद्धवजींना या प्रकल्पाचा राग आला आणि त्यांनी त्याला स्थगिती दिली. त्यामुळे संपूर्ण काम थांबलं,” असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रात काम ठप्प, गुजरातमध्ये गती

फडणवीस पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती मिळाली होती, पण गुजरातच्या बाजूला काम सुरूच होतं. त्यामुळे एका बाजूला प्रगती, तर दुसऱ्या बाजूला ठप्प अवस्था होती.”

यानंतर सत्ता परिवर्तन झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व स्थगित्या हटवण्यात आल्या. “आम्ही वेगाने जमीन अधिग्रहण केलं आणि आता प्रकल्पाचं काम झपाट्याने सुरू आहे,” असं त्यांनी सांगितलं.

2028 मध्ये बुलेट ट्रेनचा प्रवास?

या प्रकल्पाच्या भवितव्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ईश्वराच्या मनात जे असतं तेच घडतं. पुन्हा आमचं सरकार आलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि प्रकल्पाला गती मिळाली. सध्याची कामगती पाहता, 2028 मध्ये बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळेल,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या या मुलाखतीतून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासकामांचा आढावा घेतला, तर विरोधकांवर राजकीय टीकाही केली. त्यामुळे ही मुलाखत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर