Explore

Search

August 10, 2026 12:31 pm

महापालिका प्रचाराच्या रणधुमाळीत फडणवीसांचा टोला: “माझं काम बोलतं, घोषणा नव्हे” !

पुणे : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, सर्व प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. अशाच प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत घेतली. या संवादात फडणवीसांनी महापालिका निवडणुका, सत्ताधारी पक्षांतील समन्वय, तसेच विरोधकांच्या टीकेवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच “काय म्हणताय देवा भाऊ?” असा प्रश्न विचारण्यात आला असता, फडणवीस म्हणाले, “देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं कामच बोलतं.” त्यावर पुढचा प्रश्न अजित पवारांच्या टीकेबाबत होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद मोठी आहे. त्यामुळे काही ठिकाणी एकत्र लढणं शक्य नसल्याचं आधीच स्पष्ट झालं होतं. “जिथे आम्ही समोरासमोर आहोत, तिथे मैत्रीपूर्ण लढत आहे. वैयक्तिक टीका टाळण्याचा मी संयम ठेवला, मात्र दादांचा संयम थोडा ढळलेला दिसतो. पण १५ तारखेनंतर हे सगळं थांबेल,” असं फडणवीस म्हणाले.

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत विचारण्यात आल्यानंतर फडणवीसांनी मिश्कील पण सूचक प्रतिक्रिया दिली. “कोणताही परिवार एकत्र येत असेल तर आनंदच आहे. याचं श्रेय मला दिल्याबद्दल मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं. त्यांनी प्रयत्न केले, पण तेव्हा दोन भाऊ एकत्र आले नाहीत. आता ते शक्य झालं, तर बाळासाहेबांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील. मात्र दोन भाऊ-बहिण एकत्र येतील का, हे १५ तारखेनंतरच कळेल,” असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पुण्यात महिलांसाठी मेट्रोतून मोफत प्रवासाच्या घोषणेबाबत अजित पवार यांच्यावर फडणवीसांनी टोलेबाजी केली. “आज मीही जाहीर करू शकतो की पुण्यातून विमानाने उड्डाण करणाऱ्या महिलांना मोफत प्रवास मिळेल,” असं ते मिश्कीलपणे म्हणाले. पुढे ते स्पष्ट करत म्हणाले की, मेट्रो ही केवळ पुण्याची नाही, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहभागातून चालणारी व्यवस्था आहे. तिकीट दर ठरवण्याचा अधिकार ‘फेअर सिस्टिम’कडे असतो. “जे आपल्या हातात नाही, त्याची आश्वासनं देणं योग्य नाही. पुणेकरांना मोफतपेक्षा विश्वासार्ह, वेळेवर आणि दर्जेदार सेवा हवी आहे. चांगली सेवा हीच त्यांची खरी अपेक्षा आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर फडणवीसांच्या या स्पष्ट आणि थेट भूमिकेमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर