मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले. मात्र, या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता वडनगरहून अहमदाबादला हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वडोदरा येथेही भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. शिंदे यांनी या कार्यक्रमात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमात त्यांनी भाषणही केले.
दरम्यान, या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमित शाह मुंबईत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यानंतर दोघांनी जवळपास अर्धा तास एकाच वाहनातून प्रवास केल्याचेही पाहायला मिळाले होते. आता गुजरातमधील कार्यक्रमातही अमित शाह यांच्या खांद्याला खांदा लावून शिंदे सहभागी होताना दिसले.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंकडून राज्यातील अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिराती देत शुभेच्छा देण्यात आल्या. जवळपास सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये या जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून, ‘सामना’मध्ये मात्र अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही टीका केली आहे.
दरम्यान, काही काळापासून देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याची आणि राज्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपण राज्यातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच आता पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातमधील कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आणि अमित शाह यांच्यासोबत त्यांची दिसलेली जवळीक यामुळे या दौऱ्याची राजकीय चर्चा अधिक रंगली आहे.

