DJ ला फाटा; टाळ-मृदंगाच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक
शिरूर : आधुनिक काळातील DJ आणि ध्वनिक्षेपकाच्या वापराला फाटा देत वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढत वडगाव रासाई, परभणेवाडी येथील हनुमान गणेश मंडळाने सामाजिक सलोखा आणि संस्कृती जपण्याचा संदेश दिला.
शुक्रवारी (२५ सप्टेंबर) शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव रासाई, परभणेवाडी येथे हनुमान गणेश मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत DJ किंवा मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकाचा वापर न करता टाळ-मृदंगाच्या गजरात, भजन, अभंग आणि वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने गणरायाला निरोप देण्यात आला.
या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी मिरवणुकीला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. तसेच पोलीस निरीक्षक पाटील हे मिरवणुकीत सहभागी झाले आणि मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधला.
गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपणारा उत्सव आहे. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढल्यामुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासोबतच शांततामय वातावरण निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर गणेश मंडळांनीही टाळ-मृदंग, भजन, अभंग आणि वारकरी परंपरेचा अवलंब करून गणेश विसर्जन मिरवणुका आयोजित कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.
हनुमान गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. या उपक्रमातून ‘उत्सवात आधुनिकतेपेक्षा संस्कृतीला प्राधान्य’ देत शांतता, सामाजिक सलोखा आणि पारंपरिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.

