उमरगा ( प्रतिनिधी ) : येथील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयात (दि.२) ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विजय सरपे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याला आणि विचारांना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सत्य, अहिंसा, शिस्त, स्वावलंबन, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यासाठी नसून, स्वतःचा तसेच समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असावे आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या उज्ज्वल प्रगतीसाठी जबाबदार, संवेदनशील व चारित्र्यसंपन्न नागरिक बनावे, असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
पुढे बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना देशाच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. शिक्षणासोबत शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व साधेपणा अंगीकारावा, कारण मेहनतीला कोणताही पर्याय नाही, असे सांगत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच देशाच्या प्रगतीतही मोठे योगदान द्यावे आणि देशसेवा, स्वावलंबन व जबाबदारीची भावना मनात रुजवावी, असे त्यांनी नमूद केले. तसेच शास्त्रीजींनी दिलेला “जय जवान, जय किसान” हा संदेश आजही देशातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रा. पवार भाऊ, प्रा. देविदास चव्हाण, प्रा. तेजस्विनी करंडे, सेवक दगडू सुरवसे, यांच्यासह प्रथम व द्वितीय वर्षातील शिक्षक प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

