Explore

Search

October 17, 2026 4:11 am

मुख्याधिकाऱ्यांना घरचा आहेर, पाणीपुरवठा अभियंता मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार !

 

रिसोड ( तालुका प्रतिनिधी ) : रिसोड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेले अभियंता डाखोरे मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत संबंधित अभियंत्याच्या मुख्यालयी वास्तव्याची खातरजमा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

शहराचा पाणीपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सध्या शहरात पाणीटंचाई निर्माण होत आहे यंत्रणेत अडचणी निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित असते. मात्र, अभियंता डाखोरे हे मुख्यालयी उपलब्ध नसल्यास अशा समस्यांच्या निराकरणाला विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्यालयी राहण्याचे नियम केवळ कागदावरच आहेत का, असा सवालही या अनुषंगाने उपस्थित होत आहे. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपलब्धता महत्त्वाची आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अभियंत्याचे मुख्यालयी वास्तव्य, उपस्थिती तसेच कामकाजाची प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.विशेष म्हणजे, शहराचा पाणीप्रश्न आधीच गंभीर असताना पाणीपुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी मुख्यालयी उपलब्ध नसल्याची तक्रार प्रशासनासाठी ‘घरचा आहेर’ ठरणारी आहे. त्यामुळे आता मुख्याधिकारी या तक्रारीवर काय भूमिका घेतात आणि कोणती कार्यवाही करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सदर निवेदनावर बंडू वानखेडे, विष्णू कदम, संतोष चऱ्हाटे, विजय जाधव, महेफुजा बी , शबाना बी रियाज पठाण, अकबर खान, शितल बंडू वानखेडे,सौ. शामली सागर डांगे, सिकंदर खान इत्यादी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर