इचलकरंजी : खोतवाडी, ता. हातकणंगले येथे कंपनीतील मशिनमध्ये कांड्या भरण्याचे काम करत असताना महिलेच्या ड्रेसची ओढणी मशिनमध्ये अडकून गळ्याला फास बसल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.मृत महिलेचे नाव आकूबाई महादेव पोवार (वय ३६), रा. गीताई प्ले स्कूलच्या मागे, खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकूबाई पोवार या श्रीभू फॅब्रिक्स, अयोध्यानगर, खोतातवाडी येथे काम करीत होत्या. काम करत असताना त्यांच्या ड्रेसची ओढणी मशिनमध्ये अडकली. ओढणीचा गळ्याभोवती गळफास बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वर्दीदार संतोष राजप्पा बेळकी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली. मृतदेह पुढील प्राथमिक तपासासाठी पोलीस कॉन्स्टेबल ५७४ तेलंग यांच्याकडे रवाना करण्यात आला.
या घटनेची नोंद बी.एन.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, पो.हे.कॉ. सुतार यांच्याकडे दाखल अंमलदार म्हणून तर पो.हे.कॉ. गायकवाड हे चौकशी अंमलदार म्हणून तपास करीत आहेत.

