Explore

Search

October 17, 2026 4:59 am

दौंडमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना अटक; ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त!

दौंड : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या घटनांचा तपास करत पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा गुन्ह्यांची उकल केली असून, आरोपींकडून ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणांची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान पोलिसांनी दीपक बळभीम पवार (वय २६, रा. आराळे वस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि युवराज सचिन लोखंडे (वय २८, रा. उंडेट, ता. इंदापूर, जि. पुणे) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दौंडसह यवत, रांजणगाव आणि जेजुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांशी त्यांचा संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून दौंड पोलीस ठाण्यातील दोन, यवत पोलीस ठाण्यातील दोन, रांजणगाव पोलीस ठाण्यातील एक आणि जेजुरी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली आहे. या कारवाईत ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा एकूण सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक भोर विभागाचे अधिकारी आणि बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच दौंड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर