Explore

Search

October 17, 2026 5:00 am

रिसोडमध्ये चंदनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; ९ किलो चंदनासह तिघांना अटक !

रिसोड : रिसोड परिसरात चंदन चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून नऊ किलो चंदन जप्त केले असून, त्याची किंमत २७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सलमान खान अजिज खान (वय ३५), शेख चांद शेर नुर मोहम्मद (वय ३८) आणि अब्दुल रहीम अब्दुल रज्जाक (वय ३७), अशी आहेत. तिघेही रिसोड येथील रहिवासी आहेत.

रिसोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदन चोरीप्रकरणी फिर्यादी गजानन नागाणा माळेकर यांच्या तक्रारीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.वरिष्ठांच्या निर्देशानंतर पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर रिसोड येथून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान त्यांच्याकडून नऊ किलो चंदन जप्त करण्यात आले.

पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस हवालदार गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, पोलीस अंमलदार अमोल इस्तकर, दीपक घुगे आणि वाहनचालक सुनील तायडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.चंदनाला बाजारात मोठी मागणी असल्याने चंदन चोरीच्या घटनांकडे पोलिसांकडून गांभीर्याने पाहिले जात आहे. अटक केलेल्या आरोपींचा अन्य चंदन चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर