Explore

Search

October 17, 2026 4:59 am

उमरग्यात घटस्थापनेला श्री महालक्ष्मी देवीच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना !

उमरगा ( प्रतिनिधी धाराशिव ) : घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, उमरगा शहरातील धनगरवाडा येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अत्यंत भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या वर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिरात करण्यात आलेली देवीच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि पारंपारिक पालखी सोहळा ठरला.

उत्सवाच्या सुरुवातीला श्री महालक्ष्मी देवीची भव्य पालखी काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि “महालक्ष्मी माता की जय” च्या जयघोषात ही पालखी शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली. यानंतर पालखीने स्थानिक महादेव मंदिराला भेट दिली. महादेव मंदिर परिसरात दोन्ही दैवतांची भेट घडवून आणण्याचा नयनरम्य सोहळा भाविकांना अनुभवता आला. तिथे आरती झाल्यानंतर पालखी पुन्हा मोठ्या उत्साहात श्री महालक्ष्मी मंदिरात परतली व देवीला मंदिरात सन्मानपूर्वक स्थानापन्न करण्यात आले.
या वर्षीच्या नवरात्रोत्सवाचे विशेष महत्त्व म्हणजे मंदिरात स्थापित करण्यात आलेली देवीची नूतन मूर्ती ही देखणी नवीन मूर्ती कल्पनाताई माळगे आणि दीपक येळापुरे यांच्या वतीने अत्यंत श्रद्धेने देवी चरणी अर्पण करण्यात आली. महालक्ष्मी देवी मंदिराचे अधिकृत पुजारी सुरज वोहारे यांनी या नूतन मूर्तीची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर विधीवत पूजा-अर्चा व घटस्थापनेचे धार्मिक विधी संपन्न केले.

महाराष्ट्र हेडलाईन्स न्यूज शी बोलताना वोहारे व सुरवसे यांनी म्हटले की, “बळीराजा सुखावूदे, सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी लाभो दे” अशी प्रार्थना आम्ही या शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी चरणी केली आहे,” असे त्यांनी सांगितले. हा  भव्य धार्मिक सोहळा सुरळीत आणि यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशांत मोरे, किरण पिसके, बसवराज मुलगे, गोपाळ घोडके, अमरदीप पंडित, शिवशंकर सुरवसे, संतोष मनुरे, यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी व मंडळाच्या सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. यावेळी उमरगा शहर व परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते.

घटस्थापनेचे विधी पूर्ण झाल्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पुढील नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर